Saturday, April 3, 2010

किमया

अजब तुझे हे राज्य विधात्या अजब तुझी दुनिया
मर्त्य मानवाच्या शब्दांत वर्णू कशी ही किमया

कसे रुजविलेस बीजाच्या मनी स्वप्न आभाळावर जाण्याचे
कसे शिकविलेस यमुनातीरी, बासाला स्वर गाण्याचे
तहान भागवण्या डोंगरांची, सोडलेस निर्झर का रे     
की अभिषेका ओतलेस मस्तकी दूध त्यांच्या सारे   

सौंदर्य श्रावणी अप्सरांचे जमिनीवर चितारले कुणी 
अंथरले वाटेत त्यांच्या गालिचे जरतारीचे कुणी
उडणारे मखमली रंग नेमके वाऱ्यावर सांडलेस कसे
भुलवाया त्यांसी रान नेटके प्रदर्शनी मांडलेस कसे

भुरभुरणाऱ्या बर्फाचा एवढा हिमालय बनवलास कसा
चिकट मेणाच्या पोळ्यामध्ये मध फुलांचा गाळलास कसा
ढगांच्या मध्यावर इंद्रधनुषी पूल बांधलास कसा  
अधांतरी अंतराळात पृथ्वीचा गोल टांगलास कसा 

वाळूच्या आड दडवल्यास खोल विहिरी तेलाच्या   
सोन्यास दिलीस लकाकी भट्टीत काळ्या कोळशाच्या
कशी केलीस करणी नारळाच्या पोटी गोड पाणी 
अफाट सागरात सांडलीस मात्र मिठाची गोणी

मातीतून घडतसे मूर्ती कुंभाराच्या हातून जशी  
बनवलीस चाकावर कोणत्या दुनिया रे इथे अशी
फिरत असे आसावर गरगर जरी भोवरयापरी   
दिसत नसे का आम्हांस तुझ्या हातातली रेशमी दोरी

अजब तुझे हे राज्य विधात्या अगण्य तुझी ही माया 
शब्दांत सांगण्या सदा जन्म मज इथेच दयावा

Sunday, March 28, 2010

वाद

लिहिण्याचा प्रयत्न करताना प्रासंगिक कविता राहून गेल्याच बरेच दिवस मनाला खटकत होतं.
संवादात्मक वळणाने जाणारी कविता लिहिण्याची मजा वेगळीच आहे कारण त्यात विचारांचा प्रवाह सुरळीत ठेवणं, घटना कल्पित करणं आणि त्यातून दोन्ही पात्रांची बाजू समतोल मांडण कठीण आहे.
छोट्या छोट्या गोष्टीतूनही होणारे वाद,वादातून होणारा संवाद,कल्पना, प्रत्यंतर आणि अखेर त्यातूनच घट्ट होणारी नाती अशी ही गमतीशीर कविता     

[माझ्यासारख्या वक्तशीर माणसाच्या आयुष्यात असले प्रसंग कमीच येतात..LOLz :D
त्यामुळे ही कविता आणि त्यातला संवाद पूर्णतः काल्पनिक आहे, तरीही प्रत्येकाला आपलीच वाटेल मला खात्री आहे]


वाद

"किती उशीर केलास यायला, वेळेचं काही भान आहे का..
हाताची घडी तसूभरही इकडेतिकडे न हलवता

उजव्या पायाची बोटं जमिनीवर आपटतच तिने खडसावलं
आणि मी आणखी किती वेळ थांबावं अशी तुझी इच्छा आहे?"

"जोपर्यंत घडयाळाचे काटे तुझ्या नाजूक मनगटांना टोचत नाहीत
आणि फुगुन लाल झालेल्या गालांतली हवा जाऊन

त्याजागी खळ्यांचे गुलाब जोपर्यंत खुलत नाहीत
बस तेवढा वेळ तर थांबशील ना?" मी घाबरतंच विचारलं

"तू म्हणजे ना, बोलण्यात कधी हार जाणार नाहीस
आज काय नवीन कारण सांगणार आहेस

मी ऐकून घेते म्हणून हल्ली अतीच करायला लागलायंस
दुसरयाचा विचार करायला कधी शिकणार देव जाणे"

मी म्हटलं, "हा प्रश्न आपला तू तुझ्या देवालाच विचार
दिवसेंदिवस स्वतःचा कमी आणि तुझाच सारखा विचार करतो,

बोलण्यात फक्त हरायचं बाकी राह्यलय आता
बाकी श्वासांसासकट सगळं हरवून बसलोच आहे मी"

"एखाद दिवशी मी अशी उशीरा आले तर काय करशील"
"काय करणार...वाट बघत बसेन अशीच कोपरावर हनुवटी टेकवून"

पण थातूरमातूर उत्तराने समाधान कसं होईल तर कसलं
लगेच तिने विचारलं कशी..चातकासारखी का चकोरासारखी?

"चकोरासारखा काल्पनिक असतो, चातकासारखे पंख असते
तर आलो नसतो का क्षणार्धात उडत तुझ्यापाशी
   
खरंतर..नुसतं पिस असतो तरी चाललं असतं
वाऱ्यावर तरंगत येऊन तुझ्या कुशीत विसावलो असतो"

हे ऐकून तिची कळी जरा खुलली, पण इतक्या सहज ऐकेल तर ती कसली
तिचं उत्तर तयारच होतं, "म्हणे उडणारा रंगीत पक्षी,

मग चांगला पिंजऱ्यात डांबला असता तुला मी
म्हणजे नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहिला असतास"

मी म्हटलं, "तुझ्या नजरकैदेतलं जिणं मला मंजूर आहे
आभाळाची साथ सोडणं मला कबूल आहे, बस एक छोटीशी अट आहे

जादुगारीणीचा जीव जसा पक्ष्यात असतो तसा
तुझा जीव जर माझ्यात राहणार असेल तरंच"

मग ती वरमली, अरे वेड्या, काय एवढं मनाला लावून घेतोस सारं
आणि तुला कोंडून ठेवणं म्हणजे स्वत:लाच कोंडण नाही का

पिंजरयाचं दार उघडं ठेवलं तरी निसटणार नाहीस खात्री आहे
जीव सदैव तुझ्यातच आहे म्हणूनच तर करमत नाहीना

मी म्हटलं "चला, तेवढंच आम्हाला समाधान लाभलं  
अख्खी संध्याकाळ भांडणात जाउनही सारं शेवटी सुरळीत झालं"

वाद आज झाले, उद्याही होतील, नुसत्याच गोडीत गंमत काय
समोर फक्त तू असलीस की बास, जन्माला अजून पुरलंय काय