Sunday, April 3, 2011

आठवण ठेवा

खिशावर कागदाचे झेंडे लावून परस्परांना शुभेच्छा पाठवताना
आपणही या काळ्या मातीचं काही देणं लागतो याची

आठवण ठेवा

दूरदर्शनवर सैन्यदलाचं संचलन पलंगावर आडवं लोळून बघताना
किमान राष्ट्रगीताला तरी ताठ मानेनं उभं राहून मानवंदना देण्याची

आठवण ठेवा

मॅन्चेस्टरचे लाल झुळझुळीत कपडे घालून बियरचे ग्लास नाचवताना
त्याच कपड्यांविरुद्ध सत्याग्रह करताना बाबू गेनूच्या छातीवरून गेलेल्या ट्रकची

आठवण ठेवा

कालपर्यंत कमरेचं उतरवून ठेवणारयांना पद्म पुरस्कार देताना
स्वाभिमानाचा एक पंचा तेवढा नेसून सारा देश फिरलेल्या महात्म्याची

आठवण ठेवा

महापुरुषांच्या नावाच्या विड्या ओढताना आणि शहरांच्या नावाचे तंबाखू चघळून
निर्लज्जपणे जमिनीवर थुंकताना ती मिळवताना किती रक्त सांडले याची

आठवण ठेवा

बातम्यांच्या नावाखाली आरडाओरड करताना, हुतात्म्यांचे भांडवल करताना
तुरूंगात उघड्या अंगावर लाठ्या एक शब्द न काढता झेललेल्या तरूणांची

आठवण ठेवा

धृतराष्ट्राप्रमाणे मुकाट डोळे मिटून वर्षाकाठी लाखोंनी लोकसंख्या वाढवताना
यवनांच्या आक्रमणांना थोपवताना पानिपतात कापल्या गेलेल्या पिढ्यांची

आठवण ठेवा

रांगेत उभे राहायचा आळस करताना, पण शंभराची लाच त्वरेने पुढे करताना
ह्याच स्वराज्यासाठीच अंदमानात काळ्यापाण्याचे घाणे ओढणारया तात्यारावांची

स्वातंत्र्याची ६३ वर्षे उलटून गेली तरी न बदललेल्या परिस्थितीची
आणि ती बदलण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची

आठवण ठेवा!!!