Monday, July 5, 2010

दान

माफ कर माये,

तुझ्या पदरात अवसेच दान घालण्याइतकं
मनाचं ऐश्वर्य आता आमच्याकडे उरलं नाही
तुझ्या खांद्यावरची भुकेली पोर रडत असेलही
पण ते ऐकू येण्याइतकं आमचं हृदय ओलं राहिलं नाही

यंदाच्या दिवाळीत अजून पाच दहा टक्के वाढतील का याचीच आम्हाला पडलीय

माफ कर माये,

तुझ्या नवऱ्याच्या उघड्या अंगावर पडणारे
चामड्याचे आसूड ऐकू येत नाहीत आताशा
बुगबुग वाजणारं ढोलकं कानांना छळत नाही
आणि मुलाच्या पाठीवरचे कोवळे वळ डोक्यात झोंबत नाहीत

आम्हाला फक्त हातातली कडक लक्ष्मी दुप्पट कशी होईल याची पडलीय

माफ कर माये,

दगडाच्या चिपळ्या हल्ली आतल्या पांडुरंगाला साद देत नाहीत
पेटीचे केविलवाणे काळे पांढरे सूर समजत नाहीत आम्हाला
तुझ्या म्हातारयाच्या आंधळ्या बासरीतलं करुण आर्जव उमगत नाही
आणि शर्टाच्या खिशाकडे आमचे हात नकळतही सरकत नाहीत

फक्त त्यातल्या blackberry ची थरथर ऐकण्यास आमचे कान आसुसले आहेत

माफ कर माये,

तुझ्या हातातल्या टोपलीवर अवलंबून असलेलं तुझं घर
आणि धावत्या गाडयांमध्ये अस्ताव्यस्त झालेला संसार दिसत नाही आम्हाला
डझनभर फळांचे दहा रुपडेही बाजूच्याने द्यावेसे वाटतात
हातातली फोडलेली संत्री नाक चाळवत नाहीत आता

फक्त तुझं कष्टाने काचलेलं शरीर पाहतांना आमच्या भुकेल्या नजरा चाळवल्या जातात

माफ कर माये,

तुला श्रम देणारे, देशोधडीला लावणारे
भिकारी तर आम्हीच आहोत

तेव्हा आता आणखी मागून लाजवू नकोस,
पण जमल्यास आमच्यासाठीच
वाण माग देवाकडे थोडं

परत फिर, जपून रहा,
शक्य असेल तर विसरून जा,

बस जाताजाता मांडीला हात लावून
आशीर्वाद तुझा देऊन जा...

Sunday, July 4, 2010

मनातल्या मनात

उजाडत्या दिवसाबरोबर अंगणात ये
उमलत्या फुलांसारखे आळोखेपिळोखे देत
हात फिरवून चेहऱ्यावरचं दंव सारं टिपून घे
जांभई देतादेता थोडी कोवळी किरणंही पिऊन घे

कोवळ्या किरणांकडे पाहत हात पसर
बघ कोणी जवळ येऊन अलगद हातात घेतंय का

जरा बाहेर पड गावाची वेस ओलांडून
गवताच्या पिवळ्या पात्यांसंग डोल तुही
बुजगावण्यासारखी कावळ्यांना उडव
पक्ष्यांची बोबडी चिवचिव भरून घे मनात

मग हिरव्या पानांच्या सळसळीकडे कान दे
ऐक दुरून कोणाची शिटीवर साद येतेय का

खिडकीच्या थंड दांडीवर हनुवटी रेलून
मागे पडणाऱ्या झाडांसारखी मागे जा
भुरभुर उडणाऱ्या केसांवर हात फिरव
झुळझुळ वाऱ्यावर डोळे मिटून पड क्षणभर

दचकून उठ आणि इकडेतिकडे पहा
शेजारची खुर्ची अजून रिकामीच दिसते का

मग खिशातल्या मोबाईलशी चाळा कर
आवडीचे गाणं सापडतंय का बघ कुठे
खुशीत येऊन मनात गुणगुण थोडसं
खुर्चीच्या दांडीवर बोटांनी ताल दे

आणि समेवर येताच टिचकी वाचवून उघड डोळे
बघ हसून समोरून कोणी दाद देतंय का

बसमधून उतरून एकटीच निघ मग
स्टेशनसमोरच्या अलोट गर्दीत हरवून जा
ऑफिसच्या दिशेने झपझप पावलं उचल
तिथे पोचून कागदांच्या ढिगार्यात बुडून जा

मनातल्या मनात फक्त एकदा विचार आणून बघ
आता या स्थितीतही कोणी तुझ्यावर कविता लिहितंय का

वचन

"एक दिवस तुझं तूच ठरवून टाकलंस आणि
मीही सवयीने डोळे मिटून हो म्हणून टाकलं
प्रयत्न करू म्हटलं, विसरून जाऊ म्हटलं,
बस एक विचारायला विसरलो, विसरायचं कसं

पानांपानावर पसरलेलं, एवढ्यातंच पुसायचं कसं
खोडाखोडांवर कोरलेलं, एवढ्यातंच खोडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

सारं सारं विसरून जायचं
मनात काही ठेवायचं नाही
ओठांवर काही आणायचं नाही
आणि कागदावरही खरडायचं नाही

रात रात जागून लिहिलेलं एका फटक्यात फाडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

यापुढे भेटायचं नाही, बोलायचं नाही
एकमेकांबद्दल विचारायचंही नाही
उत्तर मागायचे नाही, प्रश्न करायचे नाही
संकेत नाहीच, साधा संपर्कही ठेवायचा नाही

पात पात आणून विणलेलं, क्षणात उसवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

पुन्हा एकत्र चालायचं नाही
पुढेमागेही घुटमळायचं नाही
भूतकाळ उकरून काढायचा नाही
भविष्यांच मनोरथ सजवायचं नाही

वर्तमानात पुन्हा गुंतायचं कसं, एकवचनाचं व्याकरण चालवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?

सांज सांज जळायचं नाही
थेंब थेंब गळायचं नाही
काट्यासारखं रुतायचं नाही
तीळ तीळ तुटायचं नाही

नसांनसात भिनलेलं, इतक्यातंच कापायचं कसं..
एवढंच सांग, जगायचं कसं?

वितळायचं नाही, विझायचं नाही
भिजून हळवंही व्ह्यायचं नाही
दुखुन घ्यायचं नाही, खुपवून घ्यायचं नाही
रडायचं तर नाहीच नाही

अनवाणी उन्हात चालायचं कसं, स्वत:च्याच सावलीपासून लपायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?"

Saturday, July 3, 2010

चेपेन चेपेन... My version (original composition by Sandeep Khare-Saleel Kulkarni)

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन,
सीरिज हरलो, कपही पाडला
इज्जत म्हणते चेपेन चेपेन..

सराव कमी दौरयावरती पार्ट्या जास्ती झाल्या रे
केस आणी केक यांच्या चर्चा जास्ती झाल्या रे
दीपिका म्हणते पत्ता कट
युवराज म्हणतो कापेन कापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

चार बाहेर्,एक बंपर, असली सगळी बॉलींग हयांची
९० ओवर टाकत नाहीत,रक्क्म का नाही कापत त्यांची
ब्रेटली म्हणतो शेकवेन शेकवेन
बकनर म्हणतो ढापेन ढापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

मैदानावर धमक्या देती, वर बंदीची शिक्शा देती
पेपर आणि लोक ह्यांचे तरी आमच्यावरच चढती

माकड म्हणते हुपहुप हुपहुप
पाँटिंग म्हणतो कोर्टात खेचेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

पुण्याईवर मळते आहे वन-डे टीमचे तिकीट रे
सीनियर्सना ही दिसते आहे आयपीएलचे पाकीट रे
गिली म्हणतो टाटा टाटा बाय बाय
तिकडे जाऊन छापेन छापेन

पवार म्हणतात चेपेन चेपेन,
नेक्सन म्हणतो चेपेन चेपेन..

पुन्हा पडेल पाउस

पुन्हा पडेल पाउस, पुन्हा सुचेल कविता  
भिजवेल धरेला, पुन्हा सचैल सरिता
पुन्हा बरसेल घन, पुन्हा उमलेल मन
लाजेल वसुंधरा, पुन्हा धुक्याच्या आडून      
पुन्हा फुलतील पाने, पुन्हा उधळेल वारा  
सूर मधुर मल्हार, पुन्हा छेडतील धारा  
पुन्हा कडकेल वीज, पुन्हा हरवेल नीज
मातीत मृगाचे, पुन्हा प्रसवेल बीज    
पुन्हा कोसळेल आषाढ, पुन्हा न्हाईल श्रावण
प्रेमात पडण्या नव्याने, पुन्हा होईल कारण
 
पुन्हा पडेल पाउस, पुन्हा सुचेल कविता  
जगण्याची आस, पुन्हा मिळेल जीविता

Saturday, April 3, 2010

किमया

अजब तुझे हे राज्य विधात्या अजब तुझी दुनिया
मर्त्य मानवाच्या शब्दांत वर्णू कशी ही किमया

कसे रुजविलेस बीजाच्या मनी स्वप्न आभाळावर जाण्याचे
कसे शिकविलेस यमुनातीरी, बासाला स्वर गाण्याचे
तहान भागवण्या डोंगरांची, सोडलेस निर्झर का रे     
की अभिषेका ओतलेस मस्तकी दूध त्यांच्या सारे   

सौंदर्य श्रावणी अप्सरांचे जमिनीवर चितारले कुणी 
अंथरले वाटेत त्यांच्या गालिचे जरतारीचे कुणी
उडणारे मखमली रंग नेमके वाऱ्यावर सांडलेस कसे
भुलवाया त्यांसी रान नेटके प्रदर्शनी मांडलेस कसे

भुरभुरणाऱ्या बर्फाचा एवढा हिमालय बनवलास कसा
चिकट मेणाच्या पोळ्यामध्ये मध फुलांचा गाळलास कसा
ढगांच्या मध्यावर इंद्रधनुषी पूल बांधलास कसा  
अधांतरी अंतराळात पृथ्वीचा गोल टांगलास कसा 

वाळूच्या आड दडवल्यास खोल विहिरी तेलाच्या   
सोन्यास दिलीस लकाकी भट्टीत काळ्या कोळशाच्या
कशी केलीस करणी नारळाच्या पोटी गोड पाणी 
अफाट सागरात सांडलीस मात्र मिठाची गोणी

मातीतून घडतसे मूर्ती कुंभाराच्या हातून जशी  
बनवलीस चाकावर कोणत्या दुनिया रे इथे अशी
फिरत असे आसावर गरगर जरी भोवरयापरी   
दिसत नसे का आम्हांस तुझ्या हातातली रेशमी दोरी

अजब तुझे हे राज्य विधात्या अगण्य तुझी ही माया 
शब्दांत सांगण्या सदा जन्म मज इथेच दयावा

Sunday, March 28, 2010

वाद

लिहिण्याचा प्रयत्न करताना प्रासंगिक कविता राहून गेल्याच बरेच दिवस मनाला खटकत होतं.
संवादात्मक वळणाने जाणारी कविता लिहिण्याची मजा वेगळीच आहे कारण त्यात विचारांचा प्रवाह सुरळीत ठेवणं, घटना कल्पित करणं आणि त्यातून दोन्ही पात्रांची बाजू समतोल मांडण कठीण आहे.
छोट्या छोट्या गोष्टीतूनही होणारे वाद,वादातून होणारा संवाद,कल्पना, प्रत्यंतर आणि अखेर त्यातूनच घट्ट होणारी नाती अशी ही गमतीशीर कविता     

[माझ्यासारख्या वक्तशीर माणसाच्या आयुष्यात असले प्रसंग कमीच येतात..LOLz :D
त्यामुळे ही कविता आणि त्यातला संवाद पूर्णतः काल्पनिक आहे, तरीही प्रत्येकाला आपलीच वाटेल मला खात्री आहे]


वाद

"किती उशीर केलास यायला, वेळेचं काही भान आहे का..
हाताची घडी तसूभरही इकडेतिकडे न हलवता

उजव्या पायाची बोटं जमिनीवर आपटतच तिने खडसावलं
आणि मी आणखी किती वेळ थांबावं अशी तुझी इच्छा आहे?"

"जोपर्यंत घडयाळाचे काटे तुझ्या नाजूक मनगटांना टोचत नाहीत
आणि फुगुन लाल झालेल्या गालांतली हवा जाऊन

त्याजागी खळ्यांचे गुलाब जोपर्यंत खुलत नाहीत
बस तेवढा वेळ तर थांबशील ना?" मी घाबरतंच विचारलं

"तू म्हणजे ना, बोलण्यात कधी हार जाणार नाहीस
आज काय नवीन कारण सांगणार आहेस

मी ऐकून घेते म्हणून हल्ली अतीच करायला लागलायंस
दुसरयाचा विचार करायला कधी शिकणार देव जाणे"

मी म्हटलं, "हा प्रश्न आपला तू तुझ्या देवालाच विचार
दिवसेंदिवस स्वतःचा कमी आणि तुझाच सारखा विचार करतो,

बोलण्यात फक्त हरायचं बाकी राह्यलय आता
बाकी श्वासांसासकट सगळं हरवून बसलोच आहे मी"

"एखाद दिवशी मी अशी उशीरा आले तर काय करशील"
"काय करणार...वाट बघत बसेन अशीच कोपरावर हनुवटी टेकवून"

पण थातूरमातूर उत्तराने समाधान कसं होईल तर कसलं
लगेच तिने विचारलं कशी..चातकासारखी का चकोरासारखी?

"चकोरासारखा काल्पनिक असतो, चातकासारखे पंख असते
तर आलो नसतो का क्षणार्धात उडत तुझ्यापाशी
   
खरंतर..नुसतं पिस असतो तरी चाललं असतं
वाऱ्यावर तरंगत येऊन तुझ्या कुशीत विसावलो असतो"

हे ऐकून तिची कळी जरा खुलली, पण इतक्या सहज ऐकेल तर ती कसली
तिचं उत्तर तयारच होतं, "म्हणे उडणारा रंगीत पक्षी,

मग चांगला पिंजऱ्यात डांबला असता तुला मी
म्हणजे नेहमी माझ्या डोळ्यासमोर राहिला असतास"

मी म्हटलं, "तुझ्या नजरकैदेतलं जिणं मला मंजूर आहे
आभाळाची साथ सोडणं मला कबूल आहे, बस एक छोटीशी अट आहे

जादुगारीणीचा जीव जसा पक्ष्यात असतो तसा
तुझा जीव जर माझ्यात राहणार असेल तरंच"

मग ती वरमली, अरे वेड्या, काय एवढं मनाला लावून घेतोस सारं
आणि तुला कोंडून ठेवणं म्हणजे स्वत:लाच कोंडण नाही का

पिंजरयाचं दार उघडं ठेवलं तरी निसटणार नाहीस खात्री आहे
जीव सदैव तुझ्यातच आहे म्हणूनच तर करमत नाहीना

मी म्हटलं "चला, तेवढंच आम्हाला समाधान लाभलं  
अख्खी संध्याकाळ भांडणात जाउनही सारं शेवटी सुरळीत झालं"

वाद आज झाले, उद्याही होतील, नुसत्याच गोडीत गंमत काय
समोर फक्त तू असलीस की बास, जन्माला अजून पुरलंय काय