ऊन म्हणालं ढगाला, तापून तापून कंटाळा आला
तुझी काळी छत्री चार दिवस, देतोस का रे मला
ढग म्हणाला विजेला, चल जाऊ खंडाळ्याला
माझा नवीन कॅमेरा मी, आणलाय फोटो काढायला
वीज म्हणाली आकाशाला,मी जातेय फिरायला
चार दिवस प्लीज सांभाळशील ना कामाचा पसारा
आकाश म्हणालं पाखरांना, चला उडा घरी
आजपासून चार महिने, सुट्टी तुमच्या शाळेला
पाखरं म्हणाली झाडाला,जागा दे ना राहयला
शेणाचं आणि मेणाचं, घर बांधू झोपायला
पान म्हणालं वार्याला, नेशील ना मला उंच तुझ्यासंगे
आकाशातलया म्हातारीने, बोलावलंय घरी जेवाय्ला
वारा म्ह्णाला मातीला, तुझा थोडा गंध मला देशील ना
उधळून टाकीन मी तो मग, मस्त चारही दिशांना
माती म्हणाली पाण्याला,तुझा थोडा ओलावा देशील का मला
तहान लागलीय माझ्या पोटातल्या बेडकांच्या राजाला
बेडूक राजा म्हणाला प्रजेला, झोपलात काय ऊठा
चला घसा साफ करा आणि सुरू करा गायला
बेडूक म्हणाले मोराला, उघड तुझा पिसारा
चल आपण सगळे मिळून बोलवूया पावसाला
पाऊसही आला धावत, त्यांच्या पहिल्याच हाकेला
भिजवून चिंब केलं त्याने लगेचच सगळयांना
आईची हाक ऐकताच मात्र सगळे धूम पळाले
गरम गरम चहा आणि कांदा भजी खायला...