Sunday, April 17, 2011

जिंकले रे

बेभान झाले वारे, ओसंडले रस्ते रे
हरपुन गेले ध्यान, मंतरले चित्त रे
प्रयत्नांती प्राप्य झाले सौख्य जे अप्राप्य रे
अंतरी घेऊन ध्यास.. जिंकले रे जिंकले रे

मातले तन, मातले जन, उल्हासिले हर गात्र रे
भरून आले ह्रुदय एकेक, बहरून आली रात्र रे
फेडले मुद्दल सारे, फेडले आज व्याज रे
सार्थ मनांचे इप्सित साऱ्या ..जिंकले रे जिंकले रे

रिक्त झाली आसवे आणि उधाणले हास्य रे
उन्मत्त झाले सागर, स्वर्ग झाले ठेंगणे
एक नाद, एक घोष, एक झाले राष्ट्र रे
एक स्वप्न घेत उराशी.. जिंकले रे जिंकले रे"


- नवीन वर्षाची पहिली कविता टीम इंडिया साठी :)

जाणीव

एक दिवस विसरून गेलो हात वर आकाशाकडे पसरणं
जे हवं ते स्वत:च पायाखालच्या जमिनीत शोधायला लागलो

कळलंच नाही कधी नास्तिक व्हायला लागलो

पाय देऊन तोडून जाणारयाचा चेहरा मी पाहिला नाही
घसरलेली वाळू पुन्हा उचलून डोंगरावर घालायला लागलो

कळलंच नाही कधी सहनशील व्हायला लागलो

वाटलंच नाही कोणी सावरायला येईल जवळ घेईल
एकटं वाटेल तेव्हा आपल्याच हातानी पाठीवर थोपटत राहिलो

कळलंच नाही कधी खंबीर व्हायला लागलो

संवादासाठी संगत न मिळो अथवा न दिसो चेहरा कुणाचा
आरशात पाहून मी त्याच्याशीच वार्तालाप करत राहिलो

कळलंच नाही कधी तत्वज्ञ व्ह्यायला लागलो

ठेवला न राग कुणाचा ना मनी लोभ कशाचा
दोन्ही गाल लाल होऊनही मी हसतच राहिलो

कळलंच नाही कधी विदुषक व्ह्यायला लागलो

उल्हासित आषाढ झालो, बिरहाराती वैशाख झालो
घन बरसता मन झालो, मन बरसता घन झालो

कळलंच नाही कधी कवी व्हायला लागलो