Saturday, March 27, 2010

कवितेची सुरुवात

कधी माणसांच्या गराड्यात, उगाच एकटं एकटं वाटतं
तर कधी चाकोरीचे रस्ते धरून, गर्दीबरोबर ढकललं जावसं वाटतं
लाटेबरोबर असहाय वाहत जातं विचारांचं गलबत जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी पोटातली चीड आतल्या आत पोखरत राहते,
सहन करत राहण्याची आपलीच जुनी सवय मोडाविशी वाटते
संतापाची ठिणगी चरफडत एकेदिवशी, बंद मुठीतून बाहेर पडते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी लाखवेळा डोकं टेकवूनही लीन झाल्यासारखं वाटत नाही
मूर्तीपुढे तासंतास उभं राहूनही वाटतं, आपलं गाऱ्हाणं त्याच्यापर्यंत पोचत नाही
दगडातल्या दिव्यत्वाची शंका येऊ लागते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

गर्दीतला कोण्या 'ति' चा चेहरा एक दिवस नजर खिळवून धरतो,
बहुदा आकाशातल्या प्रकाशकाचीच आज्ञा असते तशी
मग जेव्हा कानात शेकडो व्हायोलिन्स वाजू लागतात आणि सुरांचे थेंब बरसू लागतात

कवितेला...तिथेच सुरुवात होते

मग ना छंदाच भान उरतं ना लयीचं, कोणीतरी हात धरून लेखणीला नाचवत राहतं
वाऱ्याबरोबर सांडलेली फुलं आपोआपच हारांत ओवली जावीत, अक्षरंही तशीच नकळत गुंफली जातात
हळव्या ओठांना मौनाचं भाषांतर अवघड वाटतं जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कवी आणि कवितेचं नातंच जरा विचित्र असतं, कागदावर समोर असलं तरी मनात तितकंच अव्यक्त असतं
त्याला खूप काही सांगायचं असतं पण सगळंच लिहीता येत नाही
आणि तिला सतत बोलूनही मोकळं झाल्यागत वाटत नाही

तरीही त्यांना एकमेकांची, साथ पुन्हा हवीशी वाटते जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

Sunday, March 21, 2010

जिंदगी

एवढंच विचारतो मित्रा, जरा सांगशील का रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ? 



सुट्टीतही पाच वाजता न चुकता उठलास

बारा वाजेपर्यंत बिछान्यात लोळलास का कधी ?

जिमखान्यात गेलास,हॉबी क्लासलासुद्धा गेलास

काटलेल्या पतंगाच्या मागे धावलास का कधी ?


चेस आणि बिझनेस मध्ये नेहमीच जिंकत आलास

गोट्या खेळताना खड्ड्यात चकुन राजा झालास का कधी ?

मोठा होताना तुझा बालपण हरवलस का रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?




पुस्तकांच्या ढिगाऱ्यात आयुष्यभर रमलास

युनिफोर्मच्या घडीसारखा टापटीप राहिलास

शार्प केलेल्या पेन्सिलींची फुलपाखर केलीस का कधी ?

इंग्लिशची नवीन मिस तुला आवडली नाही का रे कधी ?

पहिल्या बाकावर बसून सगळं लेक्चर नीट ऐकलंस

वहीमध्ये नोटस काढून पेपरातही तसच छापलस

बाकाखाली लपून चोरून डबा खाल्लास का कधी

खिडकीबाहेर डोकावून माकडवाल्याचा खेळ पाहिलास का कधी ?

शाळेत फळ्यावर नाव लावलस,पण बाकावर कोरलस का रे ?

आयुष्य खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?



टायची नॉट सांभाळत "व्हाईट कॉलर " राहिलास

हेल्थ आणि हायजीन जपत घरातच बसलास

होळीच्या गुलालात चिंब रंगलास का कधी

वळवाचा पाउस धो धो अंगावर घेतलास का कधी

विटामिनच्या गोळ्या आणि सिरप पिऊन वाढलास

पाणीपुरीचा ठसका चाखलास का कधी

फिटनेससाठी काय काय नाही केलंस

पण पंगतीत गुलाबजाम ओरपलेस का कधी

झोपेच्या गोळ्या घेण्यापेक्षा चांदण्या का नाही मोजल्यास रे

आयुष्य खूप जगलास, जिंदगी का नाही जगलास रे ?



फ्रेंडलिस्ट आणि ग्रुप्स वर पुष्कळ मित्र जमवलेस

कोपऱ्यावरच्या टपरीवर चायसुट्टा केलास का कधी ?

सीसीडी आणि Inox च्या multiplex माहोलात हिंडलास

गर्लफ्रेंड बरोबर पावसात खंडाळ्याला भिजलास का कधी ?

आवाज न येणाऱ्या, AC गाडीत खुपदा फिरला असशील,

बिझनेस क्लास मधून हवेतही उडला असशील,

पण जागेवर रुमाल टाकून, खिडकीतून एसटीत चढलास का कधी

तीन माणसांच्या सीटवर, पाचवा बसलास का कधी

टाइम्सच्या column मध्ये articles चिकार लिहिलीस

आठवणीत बेचैन होऊन कोणाच्या चार ओळी लिहिल्यास का रे ?

यशाच्या पायरया चढण्यात तारुण्य विसरलास का रे

आयुष्य तर खूप जगलास, जिंदगी जगलास का रे ?



वेळ गेली नाही अजून,बंधने सगळी तोडून दे

माझं ऐकशील तर पहिलं "नको" म्हणणं सोडून दे

उद्याच कोणी सांगितलंय, आज दुनिया बघून घे

आयुष्य खूप जगलास आजवर, आता जिंदगी जगून घे!!!

आभास

तुला पाहिलंय तिथं मी..

नभ धुंद झालेलं, मन कुंद भरून आलेलं
खळं लोभस लाजेचं, तुझ्या गाली विखुरलेलं

श्वासात भरून घेतलाय, रातराणीचा गंध
साठवून ठेवलाय तो शहारून गेलेला आसमंत

तुला पाहिलंय तिथं मी..

अंधारल्या गर्तेत बुडलेले, तारकांचे पुंज जसे
तुझ्या नयनीचे डोह, तितकेच अथांग,

पाण्यावर सांडलेला तो चंद्र, भरलाय या ओंजळीत
चांदण्याचे थेंब अलगद, झेललेत तळहातांवर

तुला पाहिलंय तिथं मी..

निळ्या तारकांच्या देशी, कोऱ्या ढगांचे गालिचे
नक्षत्रांचे नकाशे, अस्फुट होती जिथे

काळ्या पाटीवर उमटती, अशनींच्या रेखा
तुझ्या नावाची अक्षरे, कोरून ठेवलीयत मी

तुला पाहिलंय तिथं मी..

सकाळ होण्याआधी, रोज पहाटेच्या झोपेत
ते स्वप्न, तो आभास कधी संपूच नये वाटणारा

घड्याळाकडे मागून घेतलीय अजून थोडी वेळ
आणि पापण्यांची चादर पुन्हा ओढून घेतलीय

तुला पाहिलंय तिथं मी..