Saturday, March 27, 2010

कवितेची सुरुवात

कधी माणसांच्या गराड्यात, उगाच एकटं एकटं वाटतं
तर कधी चाकोरीचे रस्ते धरून, गर्दीबरोबर ढकललं जावसं वाटतं
लाटेबरोबर असहाय वाहत जातं विचारांचं गलबत जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी पोटातली चीड आतल्या आत पोखरत राहते,
सहन करत राहण्याची आपलीच जुनी सवय मोडाविशी वाटते
संतापाची ठिणगी चरफडत एकेदिवशी, बंद मुठीतून बाहेर पडते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कधी लाखवेळा डोकं टेकवूनही लीन झाल्यासारखं वाटत नाही
मूर्तीपुढे तासंतास उभं राहूनही वाटतं, आपलं गाऱ्हाणं त्याच्यापर्यंत पोचत नाही
दगडातल्या दिव्यत्वाची शंका येऊ लागते ना

कवितेला...तिथेच सुरुवात होते

गर्दीतला कोण्या 'ति' चा चेहरा एक दिवस नजर खिळवून धरतो,
बहुदा आकाशातल्या प्रकाशकाचीच आज्ञा असते तशी
मग जेव्हा कानात शेकडो व्हायोलिन्स वाजू लागतात आणि सुरांचे थेंब बरसू लागतात

कवितेला...तिथेच सुरुवात होते

मग ना छंदाच भान उरतं ना लयीचं, कोणीतरी हात धरून लेखणीला नाचवत राहतं
वाऱ्याबरोबर सांडलेली फुलं आपोआपच हारांत ओवली जावीत, अक्षरंही तशीच नकळत गुंफली जातात
हळव्या ओठांना मौनाचं भाषांतर अवघड वाटतं जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

कवी आणि कवितेचं नातंच जरा विचित्र असतं, कागदावर समोर असलं तरी मनात तितकंच अव्यक्त असतं
त्याला खूप काही सांगायचं असतं पण सगळंच लिहीता येत नाही
आणि तिला सतत बोलूनही मोकळं झाल्यागत वाटत नाही

तरीही त्यांना एकमेकांची, साथ पुन्हा हवीशी वाटते जेव्हा

कवितेला...तिथेच सुरुवात होते

No comments: