तुला पाहिलंय तिथं मी..
नभ धुंद झालेलं, मन कुंद भरून आलेलं
खळं लोभस लाजेचं, तुझ्या गाली विखुरलेलं
श्वासात भरून घेतलाय, रातराणीचा गंध
साठवून ठेवलाय तो शहारून गेलेला आसमंत
तुला पाहिलंय तिथं मी..
अंधारल्या गर्तेत बुडलेले, तारकांचे पुंज जसे
तुझ्या नयनीचे डोह, तितकेच अथांग,
पाण्यावर सांडलेला तो चंद्र, भरलाय या ओंजळीत
चांदण्याचे थेंब अलगद, झेललेत तळहातांवर
तुला पाहिलंय तिथं मी..
निळ्या तारकांच्या देशी, कोऱ्या ढगांचे गालिचे
नक्षत्रांचे नकाशे, अस्फुट होती जिथे
काळ्या पाटीवर उमटती, अशनींच्या रेखा
तुझ्या नावाची अक्षरे, कोरून ठेवलीयत मी
तुला पाहिलंय तिथं मी..
सकाळ होण्याआधी, रोज पहाटेच्या झोपेत
ते स्वप्न, तो आभास कधी संपूच नये वाटणारा
घड्याळाकडे मागून घेतलीय अजून थोडी वेळ
आणि पापण्यांची चादर पुन्हा ओढून घेतलीय
तुला पाहिलंय तिथं मी..
No comments:
Post a Comment