Wednesday, January 6, 2010
अल्पविराम
प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
कसा आहेस...विचारलंस, यातच सारं आलं
हवीय कोणाला ती आयुष्याभराची सोबत,
दोन शब्द जरा बोललो तरी मोकळं वाटेल बघ
कशाला जोडावी उगाचच जन्मोजन्मीची नाती,
आज हातात हात आहे, उद्याही राहीला तर बरं
प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
मला तुझ्याकडे खेचायला गुरुत्वाकर्षण आहेच की
मग हवीय कशाला ती नजरेची ओढाताण
तू तुझ्या बागेतल्या फुलांवर विहरत रहा मनमुक्त
माझ्याकडच्या पतंगांना झेपावायाला वातीच तप्त आकाश आहे पुरेसं
प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
आज भेटतोय कैक वर्षांनी भेटल्यासारखे, गप्पात हरवून जाऊ पुन्हा
उद्या आठवण राहिली तरी खूप आहे आणि तीही नाही उरली तरीही
कुठेतरी निळ्या पार्श्वभूमीवरचे आपले कोरे चौकोनी चेहरे
सदैव हसतीलच ना एकमेकांकडे बघून
प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
मनात आलं ते तुला सांगण्याच स्वातंत्र्य आहे ते काय कमी आहे
तसे आजही आहेतच की नलराजाचे आधुनिक हंस Archives मध्ये बंदिस्त व्हायला
गालावरचं गोड हसू फक्त राहुदे तसंच निखळ
कारण अजून 'स्माईल कॅप्चर' कॅमेर्याचं तंत्रज्ञान तितकसं अद्ययावत नाही झालंय खरं
......
प्रेम वगैरे खरंच काही नकोय गं,
आजही निरोप घेतल्यावर पुन्हा मागे वळून पाहिलस ना..त्यातच सारं आलं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment