Wednesday, January 6, 2010

बेकार


आता सारे बेकार होणार  
डोळे विस्फारून कोणाला शोधणार
का आपल्याच पावसात भिजत झुरणार
रात्र रात्र जागून कोणासाठी काढणार
का दिवस दिवस देखावे शून्यतेचे बघणार
आता सारे बेकार होणार

कानांशी खुसपूस कोण करणार
सारा संवाद कसा स्वगतच होणार  
दोघे आता एकमेकांशीच बोलणार
एक ऐकणार आणि दुसरा सोडून देणार
आता सारे बेकार होणार

तोंडाच्या तोंडच पाणीच पळणार 
दात आतल्या आत दांतओठ खाणार
सुकलेल्या टाळूवरून फिरत जीभ
मौनाचे बेचव मूग गिळत राहणार
आता सारे बेकार होणार

पोटातले खड्डे आपोआप बुजून जाणार
उरातले धपापते भाते उगाच जड होणार
मनाच्या रिकाम्या बोगद्यातून मात्र
श्वासांचे आवाज कर्कश्श घुमत राहणार  
आता सारे बेकार होणार

हातांना लेखणीचेही ओझे नकोसे 
स्पर्शाचा तर जन्मच अस्पृश्य होणार
मान खाली मान घालून   
मुकाट सारे सोसत राहणार
आता सारे बेकार होणार

आंधळी पावलं एकटीच फिरणार   
आठवणीच्या काठीचा आधार घेत घेत  
अनोळखी वाटेने, तुझी चाहूल शोधत पुन्हा   

ओळखीच्या खुणा चाचपडत निघणार..

No comments: