Sunday, April 17, 2011

जाणीव

एक दिवस विसरून गेलो हात वर आकाशाकडे पसरणं
जे हवं ते स्वत:च पायाखालच्या जमिनीत शोधायला लागलो

कळलंच नाही कधी नास्तिक व्हायला लागलो

पाय देऊन तोडून जाणारयाचा चेहरा मी पाहिला नाही
घसरलेली वाळू पुन्हा उचलून डोंगरावर घालायला लागलो

कळलंच नाही कधी सहनशील व्हायला लागलो

वाटलंच नाही कोणी सावरायला येईल जवळ घेईल
एकटं वाटेल तेव्हा आपल्याच हातानी पाठीवर थोपटत राहिलो

कळलंच नाही कधी खंबीर व्हायला लागलो

संवादासाठी संगत न मिळो अथवा न दिसो चेहरा कुणाचा
आरशात पाहून मी त्याच्याशीच वार्तालाप करत राहिलो

कळलंच नाही कधी तत्वज्ञ व्ह्यायला लागलो

ठेवला न राग कुणाचा ना मनी लोभ कशाचा
दोन्ही गाल लाल होऊनही मी हसतच राहिलो

कळलंच नाही कधी विदुषक व्ह्यायला लागलो

उल्हासित आषाढ झालो, बिरहाराती वैशाख झालो
घन बरसता मन झालो, मन बरसता घन झालो

कळलंच नाही कधी कवी व्हायला लागलो

No comments: