Wednesday, June 11, 2008

माशी


माझ्या सकाळच्या चहाच्या कपाभोवती फडफडणारया,
एका घरमाशीला मी फुकटचा सल्ला दिला
मी लहान असल्यापासून चांदोबाच्या तुपात पडत होतीस,
आता इथे पडून काय होणार, जा जाउन अमिताभच्या कपात तरी पड़ की,
“Big B की चाय में small bee” म्हणून 'आज तक' वर तरी येशील


खांद्यावर उसवलेल्या सदरयाच्या धाग्याला मी म्हटलं,
अरे तुला एवढही कसा कळत नाही रे??
माझ्या खांद्यावर फाटून काहीच उपयोग नाही रे,
एखाद्या सुपरमॉडेलच्या खांद्यावर जाउन फाट्लास,
तरच जगातली सगळी फॅशन मॅगझिन दखल घेतील तुझी

वाढत्या महागाईला पण सांगावासं वाटल मला,
एवढी वाढतेस बाई पण कोणाला तुझी ख़बर नाही,
शेवटी तु पण पडलीस आमच्यासारखीच मध्यमवर्गीय
रिलायन्सचा शेअर झाली असतीस, करीनाच्या कमरेचा घेर झाली असतीस
आणि त्यापेक्षा सही म्हणजे हिलरी आणि ओबामाची मतपेटी असतीस
तर किती काळजी केली असती सगळ्यांनी तुझी

आजीचे दुखणारे गुड्घे मात्र भलतेच हुश्शार निघाले
पुढ्चया जन्मी आम्ही सचिनचे गुड्घे म्हणून जन्माला येऊ म्हणाले...