Wednesday, June 10, 2009

येशील ना...

आंब्यांचा राज्यकारभार आटपत चाललाय, फणसांचे काटे पिकून सोनेरी होऊ घातलेत
मक्याची कणसं तयार आहेत तुझ्या एका हाकेवर निखारयांवर चढायला
आता आलास तर बरं वाटेल..

वेधशाळेच्या भरवशावर न राहता मुंग्यानी आपली भुसभुशीत घरं तयार ठेवलीयत
आणि कावळ्यांनीही काड्यांच्या घरावर प्लॅस्टिकचं छ्प्पर बांधायला घेतलय
आता आलास तर बरं वाटेल..

दिव्यांनाही आठवण येतेय फडफडणारया नाजूक पा़खरांची
आणि जाळीवरची पाल बिचारी उगाच उपाशीपोटी जिभल्या चाटत बसलीय
आता आलास तर बरं वाटेल..

बेस्ट्च्या बसेसनाही सुट्टी हवीय रोजच्या अ़खंड पळापळीतून
आणि लोकलगाड्यांनाही ट्रॅकवरुन लावायचीय गोगलगाईंशी स्पर्धा
आता आलास तर बरं वाटेल..

कोणी कोरं लाल दप्तर घेउन नाचतंय, कोणी नव्या कव्हरांचा वास घेऊन दंग झालंय
तर कोणी नीट चौरस आकारात फाडून ठेवल्यायत गेल्या वर्षीच्या वह्या होड्यांसाठी
आता आलास तर बरं वाटेल..

गुलाबी छ्त्रीच्या काड्याही आतुर झाल्यात कोणाबरोबरतरी भिजायला
खिड्कीच्या गंजलेल्या दांड्याही हळव्या झाल्यात तुझ्या स्पर्शाने रडायला
आता आलास तर बरं वाटेल..

आता आलास तर बरं वाटेल..
रानाच्या हिरव्या वाटांनाही, कवींच्या मुकया बोटांनाही
मातीच्या सुकल्या ओठांनाही, कोंबांच्या भुकेल्या पोटांनाही
मरिनड्राईव्हच्या लाटांनाही, माळशेजच्या घाटालाही

आता आलास तर खरंच खूप बरं वाटेल

येशील ना...

No comments: