Sunday, July 5, 2009

तसलं काही...


कॉलेजच्या आवारात एके दिवशी तुझ्याशी गाठ पडेल

पिक्चरच्या हिरॉईनसारखी तुझी पुस्तकं सांडणार नाहीत

आणि हिरोसारखा मीही ती उचलायला धावणार नाही

पण तरीही हिरोहिरॉईनचं जे होतं तसं आपल्यातही होउनच जाईल


पहिल्या तासापासून वर्गात नजर माझी मग तुझ्यामागे धावेल

मान पुस्तकात खाली घातली तरी चोरुन पुन्हा मागेच वळेल

तासनतास वाट बघत बसेन मी गेटसमोरच्या बसस्टॉपवर

आणि रिक्शातून एकटीच जाताना तूही हसशील उगाच,

पण तुझ्या मनात मात्र तसलं काही नसेल


तुझ्या गुलाबी रिबीनच्या बदल्यात मी ठरवून लाल रिबीन बांधेन,

एका चॉकलेटला उत्तर तुझ्या मी अख्खा डबाच पाठवून देईन

कधीतरी तुही नकळत मैत्रीचा हात पुढे करशील,

तो अलगद हातात घ्यायची माझीही इच्छा अनावर होईल

पण तुझ्या मनात मात्र तसलं काहीच नसेल


वहीच्या शेवटच्या पानावर तू मला तुझा नंबर लिहून देशील

वर "कधीही फोन कर" अशी परवानगीही देशील,

मी मात्र एकटक पाहत बसेल तुझ्या सुंदर अक्षराकडे,

नावातलं एकेक अक्षर आणि त्याचं वळण मनात साठवेन

तुझ्या मनात मात्र तसलं काही नसेल


मग कधीतरी कारण काढून मी तो नंबर फिरवेन

पण तुझं हॅलो ऐकून माझा आवाज हरवून जाईल आतमध्येच

ह्रदयाची दणदण तुलाही ऐकू येईल पलीकडे,

आणि फोन करणारयाचं नाव श्वासातलं दडपणच सांगेल

तुझ्या मनात मात्र तसलं काही नसेल


ओळख वाढत जाईल, भीड चेपत जाईल,

दोघांमधले फरक अंतर बरंच कमी होईल

मग मी कधीतरी विचारेन कॉफीसाठी,

तूही भाव न खाता लगेच हो म्हणशील,

तुझ्या मनात मात्र तसलं काहीच नसेल


कॉफीच्या घोटांबरोबर मी तुला सांगीन सारं मनातलं

शब्द भरकटत जातील दोर सुटलेल्या पतंगासारखे

शेवटी एकदाचं मन मोकळा श्वास घेईल

आणि तू हसत म्हणशील "कपावर साय धरली बघ"

कारण तुझ्या मनात तसलं काही नसेल


चल, उशीर होतोय म्हणत लगबगीने निघून जाशील

मी मात्र तुझ्याकडे बघत राहीन नि:शब्द होऊन

मागे वळून पहाशील एकदा पण तुझ्या लक्षात नाही येणार

शब्दांत सांगता न येणारं माझ्या मनाचं दुखणं

कारण तुझ्या मनात तसलं काहीच नसेल

2 comments:

Anonymous said...

sundar

Satish Gawde said...

मस्त रे... बर्‍याच वर्षांनी कॉलेजच्या दिवसांत फिरवून आणलंस...