Wednesday, October 21, 2009

प्रेम तुझं माझं..


प्रेम तुझं माझं

मनाचं गुपित एक लहानसं, स्वतःपासूनच लपवलेलं

थोड व्यक्त केलेलं, बरचसं नजरेनेच दटवलेलं


प्रेम तुझं माझं..

गुलाबाचं फुलं ए ,वहीसकट जपलेलं

चॉकलेटच्या चांदीसारखं, संपल्यावरही न फेकलेलं


प्रेम तुझं माझं..

गणिताच्या उत्तरासारखं, एका पायरीत कधीच न सुट्लेलं

जे काही सुचलं ते पान फाटेस्तोवर खरडलेलं


प्रेम तुझं माझं..

शब्दांसंगे नाचलेलं, कधी उगाच ट ला ट लावुन जुळवलेलं

कवितेला स्फुरलेलं, आता कवितेपुरतंच उरलेलं


प्रेम तुझं माझं..

पहाटेच दव जणू पानांवर मोती होऊन पडलेलं

हाती धरु जाता चिमूटभर पाणी झालेलं


प्रेम तुझं माझं..

नातं जन्मांतरीचं गुंफलेलं

नियतीलाही तोडता येईना इतकं अवघड गुरफटलेलं





No comments: