उलटून आल्बमची पानं काही वर्ष मागे जावं
बंद कपाटाच्या आडून माझं बालपण पुन्हा यावं
घेऊन कागद हाती, रंगात बुडवून बोटे,
ओढाव्या रेघोट्या, थोडे मारावे फराटे
कातराव्या झिरमिळ्या, सोनेरी कागदाच्या
वेचाव्या पाकळ्या मुठी बकुळफुलांच्या
पारंबीच्या झुल्यांवर उंच उंच जावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं
काढावे देखावे तसेच त्रिकोणी डोंगरांचे
दिसावे क्षितिजावर पुन्हा आकडे चाराचे
गवताच्या घरात दोन माणसं काड्यांची
खळीदार चेहरे अन पोकळ डोक्यांची
नागमोडी नदीमागुन सूर्यानेही हसावं ,
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं
काडेपेटीचे खुळखुळे आणि शाळेची इमारत
फडकत्या पताका लावून करावी सजावट
धावदोऱ्याने भरावे मऊ कापडाचे तागे
मळून चिकणमाती हातही सुगंधी व्हावे
जिलेटीनच्या कंदिलासारखं वाऱ्यावर डोलावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं
सुट्टीत मांडावे डाव टिक्कर कवड्यांचे
व्यापारी बनून ढीग जमवावे नोटांचे
शिडीने वर चढावं साप चावून खाली यावं
पत्त्यांचे हात ओढताना जेवण विसरून जावं
आजीच्या गोष्टी ऐकत गोधडीवर निजावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं
एक दिवस तरी माझ्या मनासारखं व्हावं
दिव्यातल्या राक्षसाने गोष्टीतून बाहेर यावं
हातातलं जादूचं घड्याळ थोडं फिरवावं
उडत्या गालिच्यावर बसून पुन्हा मागे न्यावं
बंद कपाटाच्या आडून परत सारं यावं
उलटून आल्बमची पानं पुन्हा बालपण यावं
No comments:
Post a Comment