Monday, July 5, 2010

दान

माफ कर माये,

तुझ्या पदरात अवसेच दान घालण्याइतकं
मनाचं ऐश्वर्य आता आमच्याकडे उरलं नाही
तुझ्या खांद्यावरची भुकेली पोर रडत असेलही
पण ते ऐकू येण्याइतकं आमचं हृदय ओलं राहिलं नाही

यंदाच्या दिवाळीत अजून पाच दहा टक्के वाढतील का याचीच आम्हाला पडलीय

माफ कर माये,

तुझ्या नवऱ्याच्या उघड्या अंगावर पडणारे
चामड्याचे आसूड ऐकू येत नाहीत आताशा
बुगबुग वाजणारं ढोलकं कानांना छळत नाही
आणि मुलाच्या पाठीवरचे कोवळे वळ डोक्यात झोंबत नाहीत

आम्हाला फक्त हातातली कडक लक्ष्मी दुप्पट कशी होईल याची पडलीय

माफ कर माये,

दगडाच्या चिपळ्या हल्ली आतल्या पांडुरंगाला साद देत नाहीत
पेटीचे केविलवाणे काळे पांढरे सूर समजत नाहीत आम्हाला
तुझ्या म्हातारयाच्या आंधळ्या बासरीतलं करुण आर्जव उमगत नाही
आणि शर्टाच्या खिशाकडे आमचे हात नकळतही सरकत नाहीत

फक्त त्यातल्या blackberry ची थरथर ऐकण्यास आमचे कान आसुसले आहेत

माफ कर माये,

तुझ्या हातातल्या टोपलीवर अवलंबून असलेलं तुझं घर
आणि धावत्या गाडयांमध्ये अस्ताव्यस्त झालेला संसार दिसत नाही आम्हाला
डझनभर फळांचे दहा रुपडेही बाजूच्याने द्यावेसे वाटतात
हातातली फोडलेली संत्री नाक चाळवत नाहीत आता

फक्त तुझं कष्टाने काचलेलं शरीर पाहतांना आमच्या भुकेल्या नजरा चाळवल्या जातात

माफ कर माये,

तुला श्रम देणारे, देशोधडीला लावणारे
भिकारी तर आम्हीच आहोत

तेव्हा आता आणखी मागून लाजवू नकोस,
पण जमल्यास आमच्यासाठीच
वाण माग देवाकडे थोडं

परत फिर, जपून रहा,
शक्य असेल तर विसरून जा,

बस जाताजाता मांडीला हात लावून
आशीर्वाद तुझा देऊन जा...

No comments: