"एक दिवस तुझं तूच ठरवून टाकलंस आणि
मीही सवयीने डोळे मिटून हो म्हणून टाकलं
प्रयत्न करू म्हटलं, विसरून जाऊ म्हटलं,
बस एक विचारायला विसरलो, विसरायचं कसं
पानांपानावर पसरलेलं, एवढ्यातंच पुसायचं कसं
खोडाखोडांवर कोरलेलं, एवढ्यातंच खोडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?
सारं सारं विसरून जायचं
मनात काही ठेवायचं नाही
ओठांवर काही आणायचं नाही
आणि कागदावरही खरडायचं नाही
रात रात जागून लिहिलेलं एका फटक्यात फाडायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?
यापुढे भेटायचं नाही, बोलायचं नाही
एकमेकांबद्दल विचारायचंही नाही
उत्तर मागायचे नाही, प्रश्न करायचे नाही
संकेत नाहीच, साधा संपर्कही ठेवायचा नाही
पात पात आणून विणलेलं, क्षणात उसवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?
पुन्हा एकत्र चालायचं नाही
पुढेमागेही घुटमळायचं नाही
भूतकाळ उकरून काढायचा नाही
भविष्यांच मनोरथ सजवायचं नाही
वर्तमानात पुन्हा गुंतायचं कसं, एकवचनाचं व्याकरण चालवायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?
सांज सांज जळायचं नाही
थेंब थेंब गळायचं नाही
काट्यासारखं रुतायचं नाही
तीळ तीळ तुटायचं नाही
नसांनसात भिनलेलं, इतक्यातंच कापायचं कसं..
एवढंच सांग, जगायचं कसं?
वितळायचं नाही, विझायचं नाही
भिजून हळवंही व्ह्यायचं नाही
दुखुन घ्यायचं नाही, खुपवून घ्यायचं नाही
रडायचं तर नाहीच नाही
अनवाणी उन्हात चालायचं कसं, स्वत:च्याच सावलीपासून लपायचं कसं
एवढंच सांग, जगायचं कसं?"
No comments:
Post a Comment