उजाडत्या दिवसाबरोबर अंगणात ये
उमलत्या फुलांसारखे आळोखेपिळोखे देत
हात फिरवून चेहऱ्यावरचं दंव सारं टिपून घे
जांभई देतादेता थोडी कोवळी किरणंही पिऊन घे
कोवळ्या किरणांकडे पाहत हात पसर
बघ कोणी जवळ येऊन अलगद हातात घेतंय का
जरा बाहेर पड गावाची वेस ओलांडून
गवताच्या पिवळ्या पात्यांसंग डोल तुही
बुजगावण्यासारखी कावळ्यांना उडव
पक्ष्यांची बोबडी चिवचिव भरून घे मनात
मग हिरव्या पानांच्या सळसळीकडे कान दे
ऐक दुरून कोणाची शिटीवर साद येतेय का
खिडकीच्या थंड दांडीवर हनुवटी रेलून
मागे पडणाऱ्या झाडांसारखी मागे जा
भुरभुर उडणाऱ्या केसांवर हात फिरव
झुळझुळ वाऱ्यावर डोळे मिटून पड क्षणभर
दचकून उठ आणि इकडेतिकडे पहा
शेजारची खुर्ची अजून रिकामीच दिसते का
मग खिशातल्या मोबाईलशी चाळा कर
आवडीचे गाणं सापडतंय का बघ कुठे
खुशीत येऊन मनात गुणगुण थोडसं
खुर्चीच्या दांडीवर बोटांनी ताल दे
आणि समेवर येताच टिचकी वाचवून उघड डोळे
बघ हसून समोरून कोणी दाद देतंय का
बसमधून उतरून एकटीच निघ मग
स्टेशनसमोरच्या अलोट गर्दीत हरवून जा
ऑफिसच्या दिशेने झपझप पावलं उचल
तिथे पोचून कागदांच्या ढिगार्यात बुडून जा
मनातल्या मनात फक्त एकदा विचार आणून बघ
आता या स्थितीतही कोणी तुझ्यावर कविता लिहितंय का
No comments:
Post a Comment