Friday, September 30, 2011

" मना सज्जना "


प्रथमेश जो ईश सर्वां गुणांचा।
विलंबास प्रारंभ तो नित्य त्याचा॥
वदूनी अपशब्दे सर्व त्रिवार वाचा।
धरू मार्ग समस्त सज्जनगडाचा ॥१॥ [प्रथमेश, उमेश, महेश]

प्रभाते मनी प्रेम चिंतीत जावा।
दिसता दरी बाबू मागे स्मरावा॥
मंदार हा थोर सांडूं नये तो।
त्याच्यामुळे झोल नेहमीच होतो ॥२॥ [प्रेम, बाबू, मंदार]

नको रे मना द्रव्य ते मंडळाचे।
बूट नवीन जर पायांसी काचे॥
टोल मारणे पाप ते कर्म खोटे।
न होतां जया* सारिखें दुःख मोठे॥३॥ [सचिन, *जय]

सदा सर्वदा प्रातसमयी निघावे
न रामप्रहरी लोकांस लटकवावे    
आसन व्यवस्था चोख मागे करावी
नसल्यास वाहने सोय त्वरा बघावी ॥४॥ [ सगळे आणि जय esp]

मना लोचना चूकवीं येरझारा
खालापूरातील प्रवेशद्वारा
चुकते करावे प्रथम हिशेब सारे
वड्यासह चटणीची इच्छा नको रे ॥५॥ [ मंदार आणि जय]

कोथरूड प्रांती उष्मादाह होता
*चहापानास विवाद नसावा
विलंब टाळुनी मूक मार्गस्थ व्हावे
क्षुधाशांती साठी वणवण फिरावे ॥६॥ [मिताली, *श्रद्धा आणि कंपनी]

मुखी घास जाता सुपनेकराचे
उदरभरण यथेछ्च होई सकल जनांचे
मसालेभात थोर टांकू नये तो
कोशिंबिर ओरपून मानवी धन्य होतो ॥७॥ [मंदार, विशाल, मी आणि बाळा..जो बिचारा आम्ही किती ठुसतोय ते मुकाट बघत होता]

मुखे चालकाच्या जाता मावा सुपारी
दिसे चंद्रमा त्यास भर दुपारी
तांबुल विलास भजुनी मुखश्रुद्धी
रंगुनी रामरंगी रंगीत झाली  ॥८॥ [ड्रायव्हर, मह्या आणि रचना/मिताली]

समोर दिसता कासचे रम्य पठार
क्षणी पडतसे सर्व श्रमांचा  विसर
बहू हिंडतां सौख्य होणार नाहीं।
*शिणावे परी तृप्त न होत कांहीं ॥९॥ [मिताली आणि तेजस]

*मना रे जनीं मौनमुद्रा धरावी।
**आपलीच आपण चित्रकारी करावी॥
दिसे पांडू ते बाग सोडूनि द्यावे।
सुखालागिं आरण्य सेवीत जावे॥१०॥ [हे specially **राक्या आणि *जॉनीसाठी]

मना जी स्थळे नजरेस न गेली।
जनीं आपुली ते तुवां हानि केली॥
पिवळ्या फुलांमागे जो लीन आहे
कीटकांचे पंख तो लक्ष लावूनि पाहे॥१०॥ [मिताली, जय आणि कॅमेरा वाले]


मना टायरांचे परी त्वां जळावे
तिन्ही सांजवेळी पाणी पळावे
सदा लोककाजीं झिजे देह ज्याचा।
लाईनचा माणूस बहु गुणाचा ॥११॥ [मह्या आणि बस]

मना पावना भावना राघवाची।
धरी अंतरीं सोडिं चिंता भवाची॥
कृपा रघुवरा वाट निर्धास्त झाली
सांभाळिता SLR दमछाक झाली ॥१२॥ [ अश्विनी, श्रद्धा आणि प्रिया]

भगर आमटीचा मुखी घास घेता
धन्य रामदासी तो अन्नदाता
अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं।
तया पामरा बाधिजे सर्व कांही॥१३॥ [ to all ]

चांदण्या राती सहलीस जावे
भूत पिशाच्च न जवळी ठरावे   
जो देह रामनामे रक्षित झाला
भक्त निवासी ताणुनी निद्रिस्त झाला   ॥१४॥ [श्रद्धा आणि प्रेम]

काकडारती प्रीति रामीं धरावी।
देहेबुद्धि नीरूपणी वीसरावी॥
उरमोडी सम मार्गक्रमणा धरावी
अन्यथा पुन्हा वामकुक्षी करावी ॥१५॥ [मी,तेजस, प्रथमेश, बाबू, विशाल आणि अश्विनी]

उन्हे वाढता पावले मागे फिरावी
तरी कोणी कष्टाने गुहा पहावी
मुखी कोंबता मुठ शेवकुरमुरयाची
धरावी मग पुढे वाट ठोसे घराची ॥१६॥ [उमेश, मंदार]


दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
मामा पाहता मौज तेथेचि आहे॥
जनी सर्व कोंदाटले ते का कळेना
मर्कटलीला करून पोट भरेना ॥१७॥ [मंदार, मृणाल, विशाल  ]

भोजन समयी पुन्हा भीड* व्हावी
मटकी आमटी तीच पुन्हा गोड व्हावी
घरी कामधेनू** पुढें ताक मागें।
काउंटर वरी मग बहु रीघ लागे॥१८॥

[* भीड हा शब्द द्वयर्थी वापरला आहे, भीड म्हणजे हिंदीतली गर्दी असा आणि मराठीतली लाज असा, कारण extra ताक आणि पापड मागताना सर्वांनाच भीड वाटत होती)** ही ओळ ओरिजिनल आहे, मला अध्याहृत अर्थ जय, प्रेम आणि राकेश ला कळेलच बाकी सुज्ञास सांगणे न लगे ]

अभिप्रायी धारिष्ट जीवीं धरावे।
पप्पूचे पकवणे सोशीत जावें॥
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावे।***
मना सर्व लोकांसि रे नीजवावें॥१९॥ *** हे माझ्या बद्दल आहे

कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥
बहूता दिसा आपली भेट जाली।
आनंदात ही सर्व कार्ये निवाली ॥२०॥

मनाची शते ऐकता दोष जाती।
समर्थाघरी पामरे धन्य होती
जनीं सर्वसूखी असा कोण आहे।
विचारें मना तूंचि शोधूनि पाहे ॥२१॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Sunday, April 17, 2011

जिंकले रे

बेभान झाले वारे, ओसंडले रस्ते रे
हरपुन गेले ध्यान, मंतरले चित्त रे
प्रयत्नांती प्राप्य झाले सौख्य जे अप्राप्य रे
अंतरी घेऊन ध्यास.. जिंकले रे जिंकले रे

मातले तन, मातले जन, उल्हासिले हर गात्र रे
भरून आले ह्रुदय एकेक, बहरून आली रात्र रे
फेडले मुद्दल सारे, फेडले आज व्याज रे
सार्थ मनांचे इप्सित साऱ्या ..जिंकले रे जिंकले रे

रिक्त झाली आसवे आणि उधाणले हास्य रे
उन्मत्त झाले सागर, स्वर्ग झाले ठेंगणे
एक नाद, एक घोष, एक झाले राष्ट्र रे
एक स्वप्न घेत उराशी.. जिंकले रे जिंकले रे"


- नवीन वर्षाची पहिली कविता टीम इंडिया साठी :)

जाणीव

एक दिवस विसरून गेलो हात वर आकाशाकडे पसरणं
जे हवं ते स्वत:च पायाखालच्या जमिनीत शोधायला लागलो

कळलंच नाही कधी नास्तिक व्हायला लागलो

पाय देऊन तोडून जाणारयाचा चेहरा मी पाहिला नाही
घसरलेली वाळू पुन्हा उचलून डोंगरावर घालायला लागलो

कळलंच नाही कधी सहनशील व्हायला लागलो

वाटलंच नाही कोणी सावरायला येईल जवळ घेईल
एकटं वाटेल तेव्हा आपल्याच हातानी पाठीवर थोपटत राहिलो

कळलंच नाही कधी खंबीर व्हायला लागलो

संवादासाठी संगत न मिळो अथवा न दिसो चेहरा कुणाचा
आरशात पाहून मी त्याच्याशीच वार्तालाप करत राहिलो

कळलंच नाही कधी तत्वज्ञ व्ह्यायला लागलो

ठेवला न राग कुणाचा ना मनी लोभ कशाचा
दोन्ही गाल लाल होऊनही मी हसतच राहिलो

कळलंच नाही कधी विदुषक व्ह्यायला लागलो

उल्हासित आषाढ झालो, बिरहाराती वैशाख झालो
घन बरसता मन झालो, मन बरसता घन झालो

कळलंच नाही कधी कवी व्हायला लागलो

Sunday, April 3, 2011

आठवण ठेवा

खिशावर कागदाचे झेंडे लावून परस्परांना शुभेच्छा पाठवताना
आपणही या काळ्या मातीचं काही देणं लागतो याची

आठवण ठेवा

दूरदर्शनवर सैन्यदलाचं संचलन पलंगावर आडवं लोळून बघताना
किमान राष्ट्रगीताला तरी ताठ मानेनं उभं राहून मानवंदना देण्याची

आठवण ठेवा

मॅन्चेस्टरचे लाल झुळझुळीत कपडे घालून बियरचे ग्लास नाचवताना
त्याच कपड्यांविरुद्ध सत्याग्रह करताना बाबू गेनूच्या छातीवरून गेलेल्या ट्रकची

आठवण ठेवा

कालपर्यंत कमरेचं उतरवून ठेवणारयांना पद्म पुरस्कार देताना
स्वाभिमानाचा एक पंचा तेवढा नेसून सारा देश फिरलेल्या महात्म्याची

आठवण ठेवा

महापुरुषांच्या नावाच्या विड्या ओढताना आणि शहरांच्या नावाचे तंबाखू चघळून
निर्लज्जपणे जमिनीवर थुंकताना ती मिळवताना किती रक्त सांडले याची

आठवण ठेवा

बातम्यांच्या नावाखाली आरडाओरड करताना, हुतात्म्यांचे भांडवल करताना
तुरूंगात उघड्या अंगावर लाठ्या एक शब्द न काढता झेललेल्या तरूणांची

आठवण ठेवा

धृतराष्ट्राप्रमाणे मुकाट डोळे मिटून वर्षाकाठी लाखोंनी लोकसंख्या वाढवताना
यवनांच्या आक्रमणांना थोपवताना पानिपतात कापल्या गेलेल्या पिढ्यांची

आठवण ठेवा

रांगेत उभे राहायचा आळस करताना, पण शंभराची लाच त्वरेने पुढे करताना
ह्याच स्वराज्यासाठीच अंदमानात काळ्यापाण्याचे घाणे ओढणारया तात्यारावांची

स्वातंत्र्याची ६३ वर्षे उलटून गेली तरी न बदललेल्या परिस्थितीची
आणि ती बदलण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची

आठवण ठेवा!!!