एकेदिवशी जमिनीच्या आत साठवून ठेवलेल्या उष्म्याचा दाह अनावर होईल
समोरच्या सुकल्या डोंगरावरही बसेल त्या वणव्याची झळ आणि पडेल एक चुकार ठिणगी
चारी दिशांना लागेल चाहूल, चौखूर उधळत येणाऱ्या मृगाची
पानांचा एक उत्साही घोळका त्या बेफाम वावटळीवर स्वार होईल अलगद
अचानक आभाळाचा रंग इतका गडद होईल..वाटेल आता सारं सारं संपून जाणार
मग येतीलच ते...पावसाचे थेंब
गाठतील तुला गल्लीच्या तोंडाशी, एखाद्या जुन्या मित्रासारखे
तू कुठे चाललास? ह्याच्याशी त्यांना काय घेणं देणं
वाटेत आलेल्या प्रत्येकाला कडकडून भेटण्याचा रिवाजच आहे त्यांचा
लावतीलच मग ते तुझ्या पांढरया शर्टवर थोडासा चिखलाचा गुलाल,
शिंपडतील अंगावर थोडसं मातीचं महागडं अत्तर
सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब
सुरुवातीला अलगद रिमझिमणारे मोती, हळू हळू टपोरे होत जातील,
तलवारीसारखे धारधार होतील, पात्यासारखे लक्ख होत जातील
एकाक्षणी इतके गार होतील की गोठून जातील,
आणि मग मनाच्या माजघरात लपलेल्या मरगळीला
रस्त्यावर आणून असं झोडून काढतील की पुन्हा पाणी मागणार नाही
सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब
तुला वाटेल मी साहेब कडक सुटातला गाडीतून फिरणारा, मला कोण हात लावणार?
अरे त्यांनी मनात आणलं तर एका मिनटात घालतील आडवं एखादं झाड तुझ्या करकरीत गाडीसमोर
आणि समोरचा रस्ता असा अदृश्य करतील की तुला खाली उतरवावंच लागेल.
मग इतकं आतपर्यंत भिजवतील ना, असं वाटेल की शरीरात रक्त नाही पाणीच वाहतंय
बुटांचा fishtank होईल, छत्रीच तळं होईल आणि मनाचा समुद्र तुफान फेसाळून उठेल
असे सहज सोडणार नाहीत तुला ते...पावसाचे थेंब
तेव्हा वेड्या, कशाला शोधतोस छपराचा आडोसा
जे आकाशाला नाही पेलले, वाऱ्याला नाही आटपले
ते का तुझ्या फतऱ्या रेनकोटाला जुमानणार
तेव्हा सोड तो वृथा अभिमान, शरण जा त्या धारांना
अंगाची माती होऊन विरघळून जाउ दे त्या अखंड प्रवाहात
पसर हात त्या सुसाट वारयासमोर आणि मनसोक्त पिऊन घे ते समुद्रमंथनाच अमृत
मग बघ कसे आपलंसं करतील तुला ते
…
….
पावसाचे थेंब
No comments:
Post a Comment